भाजपाविरोधातील मतांची विभागणी होऊ नये म्हणून काँग्रेसची मनसे सोबत असावी, दोन्हीही बाजूने युतीसाठी प्रयत्न

Foto
मुंबई : मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईतील स्थानिक नेतृत्वाला मनसेसोबत आघाडी नसल्याचे समोर आले होते. तर पालिका निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचे संकेत पण देण्यात आले होते. पण काँग्रेसमध्ये मनसेसोबत जाण्यावरून दोन मत प्रवाह दिसून येत आहे. ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मनसेसोबत जुळवून घेण्याविषयीचे संकेत दिले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी पुन्हा मोठ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात.

सत्याचा मोर्चा मतचोरी संदर्भात होता. लोकशाही वाचवण्यासाठी होता. शेवटी आयडिओलॉजीचा प्रश्‍न महत्त्वाचा असतो. शरद पवार यांनी आपण आघाडीत लढलो पाहिजे ही भूमिका मांडली आहे, भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे अशी आमची ही भूमिका आहे. आम्ही त्यासंदर्भात सकारात्मक आहोत, असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

सत्याच्या मोर्चात महाविकास आघाडीसह मनसेने सुद्धा हिरारीने सहभाग घेतला. इतकेच काय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीच या मोर्चासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनुपस्थितीत असले तरी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे आता भाजपला महापालिका निवडणुकीत रोखण्यासाठी सर्वांनीच एकत्र येण्याचा सूर आळवल्याचे दिसून येत आहे.

भाजपवर सडकून टीका

भाजप मुंबई महापालिकेत दणदणीत विजय मिळवणार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली. ते भाजपने केलेला सर्वेक्षण असून भाजपने निर्माण केलेली काल्पनिक कथा आहे, स्वतःच मीडियाकडे माहिती द्यायची. हा लोकांचा परसेप्शन बदलविण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. काल मुंबईत अनेक मतदार ओळखपत्र मिळाले आहे. त्यामुळे भाजपला वाटत असावं जे बिहारमध्ये केलं ते मुंबईत करून दाखवू. त्यांना लोकशाही संपवायची आहे, म्हणून ते म्हणतात महाविकास आघाडी किंचित उरेल.इमानदारीने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या सर्व समोर येईल.अशी टीका त्यांनी केली.

दादागिरी, गुंडगिरीकरून पैसा, दबावतंत्र आणि यंत्रणेचा वापर करून भाजपचे 100 नगरसेवक बिनविरोध झाले आहे. पोलीस बळाचा वापर करून, धामकावून निवडणूक बिनविरोध होत असेल आणि हे आम्ही बिनविरोध निवडून आल्याची पाठ थोपटून घेत असेल तर असेच होणार. सत्ता तुमची, यंत्रणा तुमची, लोकशाही पायदळी तुडवा, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह

मुंबईतील स्थानिक नेत्यांनी मनसेसोबत न जाण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाला कळवला होता. मुंबईत चिंतन शिबिर झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला. तर खासदार वर्षा गायकवाड यांनी मारहाण करणाऱ्या, गुंडागर्दी करणाऱ्यांसोबत आमचा पक्ष कधीही जाणार नाही अशी भूमिका जाहीर केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही त्याला दुजोरा दिला. पण विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा देत मनसेसोबत जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्येच दोन मत प्रवाह असल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेससाठी थेट दिल्लीत फोन, मविआतच लढावे ठाकरेंचे प्रयत्न

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये सोबत ठेवण्यासाठी दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी संपर्क साधला आहे. काँग्रेसने मुंबईत स्वतंत्र निवडणूक लढवल्यास मतांचे विभाजन होऊन महाविकास आघाडी आणि काँग्रेस दोघांनाही फटका बसेल, असे ठाकरे यांचे मत आहे.

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने (भाजप) मुंबई महापालिकेत किमान 150 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार महायुतीत निवडणूक लढल्यास भाजपला मोठा फायदा होईल आणि 100 हून अधिक नगरसेवक निवडून येऊ शकतात. गेल्या निवडणुकीतील 82 जागांवरून ठाकरे गटाच्या शिवसेनेचे 16 आणि काँग्रेसचे 8 माजी नगरसेवक असलेल्या जागांवर भाजप दावा करत आहे, ज्यामुळे त्यांचा आकडा 106 पर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे अधिक जागा लढवण्याची भाजपने तयारी केली आहे.

काँग्रेसमध्ये मात्र मनसेसोबतच्या आघाडीवरून मतभेद आहेत. वर्षा गायकवाड यांनी मनसेला विरोध करत उद्धव ठाकरेंनी मनसेला सोडून काँग्रेससोबत यावे अशी भूमिका घेतली आहे, तर शरद पवार यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचे आवाहन केले आहे. या सर्व घडामोडी मुंबईच्या राजकारणात चुरस वाढवणार आहेत.